मुंबई : कारमध्ये महिला लेकराला दूध पाजताना पोलिसांकडून टोईंग

12 Nov 2017 12:12 AM

मुंबईच्या वाहतूक शाखेचे पोलिस किती असंवेदनशील आहेत, याचं उदाहरण सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे. महिला सात महिन्यांच्या मुलाला दूध पाजत असतानाही पोलिसांनी नो पार्किंगमधील कार टो करुन नेल्याची घटना समोर आली आहे.

मालाडमध्ये नो पार्किंग झोनमध्ये एक कार उभी करण्यात आली होती. कारमालक काही कामानिमित्त बाहेर गेला होता, तर या कारमध्ये ड्रायव्हरच्या सीटमागे महिला (त्याची पत्नी) आपल्या सात महिन्याच्या लेकराला दूध पाजत बसली होती. मात्र वाहतूक पोलिसांनी बळजबरीनं ही कार टो करुन नेली.

विशेष म्हणजे, हा व्हिडीओ काढणारा युवक वाहतूक पोलिसांना कार ओढून नेऊ नका, अशी विनंती करत आहे. कारमध्ये एक महिला बाळाला दूध पाजत आहे, म्हणून किमान गाडी सावकाश ओढा, असंही ओरडून सांगत आहे. मात्र त्याचं काहीएक ऐकता वाहतूक पोलिस कार ओढून नेत होते.

LATEST VIDEOS

LiveTV