मुंबई : बॅग चोरीमुळे वैतागलेल्या तरुणाची कुर्ला स्टेशनमध्ये लोकलसमोर उडी

19 Nov 2017 02:00 PM

मुंबईच्या कुर्ला स्थानकावर काल एक विचित्र प्रकार घडला. बॅग चोरीला गेल्यामुळे एका तरुणानं लोकलसमोर येण्याचा प्रयत्न करत स्वतःचा जीव धोक्यात घातला.

संजय पाटील नावाच्या युवकाने अचानक कुर्ल्यातील प्लॅटफॉर्म नंबर एकवर उडी मारली आणि सीएसटीहून अंबरनाथकडे येणाऱ्या फास्ट लोकलच्या दिशेने तो चालत गेला. मोटरमननं तत्परता दाखवून इमर्जन्सी ब्रेक लावल्यामुळे त्याचे प्राण बचावले.

लोकल युवकापासून अवघ्या 4 ते 5 फूट अंतरावर थांबली. त्यानंतर स्टेशनवरील प्रवासी आणि आरपीएफ जवानांनी त्याला प्लॅटफॉर्मवर खेचून आणलं.

संजय कोल्हापूरला जात असताना त्याची बॅग चोरीला गेली. त्याने कुर्ला जीआरपीमध्ये तक्रार दाखल केली. मात्र याला कंटाळून त्याने हे पाऊल उचलल्याचं पोलिसांनी सांगितलं. या सर्व प्रकारानंतर त्याला कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.

LiveTV