स्पेशल रिपोर्ट : नागपूर : गुलाबी बोंडअळीपुढे बीटीची नांगी, कापूस उत्पादक चिंतेत

12 Nov 2017 10:27 PM

विदर्भात गुलाबी बोंडअळीनं कापसावर हल्ला चढवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पहिली पसंती असलेलं बीटी वाण बोंडअळ्यांच्या भक्ष्यस्थानी सापडलं आहे. हातातोंडाशी आलेल्या कपाशीवर बोंडअळ्यांचा प्रादुर्भाव झाल्यानं विदर्भातील शेतकरी हवालदिल झाला आहे.

बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे वर्धा जिल्ह्यातील प्रशांत साहू यांचं 12 एकरावरील कापसाचं पीक उद्ध्वस्त झालं आहे. हताश झालेल्या साहूंनी आपल्या शेतात जनावरांना सोडलं आहे. हाताशी आलेलं पीक बोंडअळीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे हताश झालेल्या साहूंनी आपलं कापसाचं पीक शेतकऱ्यांना किमान चारा मिळावा म्हणून जनावरांच्या हवाली केलं आहे.

अकोला जिल्ह्यातील गजानन बोंडेंची समस्याही काही वेगळी नाही.  गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावानं गजानन बोंडेंनी आपल्या 7 एकरातील कपाशीवर नांगर फिरवला आहे. बोंडेंनी आपल्या कपाशीवर आतापर्यंत जवळपास अडीच लाख रुपये खर्च केले होते. मात्र बोंडअळीमुळे हातातोंडाशी आलेल्या पीकावर त्यांना पाणी सोडावं लागलं आहे. अंगावर असलेलं पाच लाखांचं कर्ज कसं फेडावं हा प्रश्न त्यांना सतावतो आहे. हेच चित्र विदर्भात सगळीकडेच पाहायला मिळतं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV