वाशिम : शेतकरी ज्ञानेश्वर मिसाळ यांची आत्महत्या सावकारीमुळे, मुलाची तक्रार

09 Dec 2017 11:27 PM

मानोरा तालुक्यातल्या सोयजना गावातील शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. ज्ञानेश्वर मिसाळ यांनी सावकारांच्या तगाद्यातून आत्महत्या केल्याची तक्रार त्यांच्या मुलाने दाखल केली आहे. तसेच या प्रकरणी सरपंचासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाशिम जिल्ह्यातील सोयजना येथील ज्ञानेश्वर मिसाळ यांनी 6 तारखेला यवतमाळमधील एका लॉजमध्ये आत्महत्या केली. मिसाळ यांनी 4 तारखेलाच चार ते पाच जणांना पोस्टाद्वारे पत्र पाठविलं होतं.

या पत्रात त्यांनी गावातील तीन लोकांकडून सतत सावकारी कर्जवसुलीसाठी तगादा सुरु असल्याचा उल्लेख होता. शुक्रवारी ते पत्र पोलिसांना मिळालं. यानंतर त्यांनी ज्ञानेश्वर मिसाळ यांचा मुलगा सागरकडून पत्राची सत्यता पडताळली.

याद्वारे पोलिसांनी गावातील सरपंच विनोद चव्हाण, हरीअन्ना मिसाळ, आणि लक्ष्मन खोब्रागडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तसेच दोन जणांना रात्री अटक केली, मात्र, एक जण फरार आहे.

LATEST VIDEOS

LiveTV