जयंती विशेष : चार्ली चॅपलिन-हसवणाऱ्या चेहऱ्यामागचं दु:ख

आज चार्ली चॅपलिन यांची 129 जयंती आहे. या निमित्ताने त्यांच्याबाबत काही रंजक गोष्टी जाणून घेऊया.

जयंती विशेष : चार्ली चॅपलिन-हसवणाऱ्या चेहऱ्यामागचं दु:ख

मुंबई : चार्ली चॅपलिनच्या अभिनयाने खळाळून हसला नाही, असा व्यक्ती जगात क्वचितच आढळेल. चार्ली चॅपलिनबद्दल बोलताना कोणाच्याही डोक्यात एक विनोदी पात्र उभं राहतं. पण अनेकांना हसवणाऱ्या या चेहऱ्यामागचं दु:ख कोणाला फारसं माहित नसेल. आज चार्ली चॅपलिन यांची 129 जयंती आहे. या निमित्ताने त्यांच्याबाबत काही रंजक गोष्टी जाणून घेऊया.

पोटासाठी लहान वयातच काम
चार्ली चॅपलिन यांचा जन्म 16 एप्रिल 1889 रोजी लंडनमध्ये झाला होता. त्यांचं पूर्ण नाव चार्ल स्पेन्सर चॅपलिन होतं. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारच हालाखीची होती. पोट भरण्यासाठी त्यांना वयाच्या नवव्या वर्षीच काम करावं लागलं. चार्ली यांच्या बालपणीच त्यांचे आई-वडील विभक्त झाले. यानंतर त्यांच्या आईची मानसिक स्थिती बिघडली. परिणामी वयाच्या 13 वर्षी चार्ली यांचं शिक्षणही सुटलं.

अमेरिकेत सिनेकारकीर्दीची सुरुवात
चार्ली चॅपलिन यांनी लहान वयातच नाटक आणि विनोदी कलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. अवघ्या 19 व्या वर्षी एका अमेरिकन कंपनीने त्यांच्याशी करार केला आणि ते अमेरिकेला रवाना झाले. चार्ली चॅपलिन यांनी अमेरिकेत सिनेकारकीर्दीची सुरुवात केली. 1918 सालापर्यंत ते जगातील ओळखीचा आणि लोकप्रिय चेहरा बनले होते."पण माझं हास्य कोणाच्याही दु:खाचं कारण ठरु नये"
1914 मध्ये प्रदर्शित झालेला 'मेकिंग अ लिव्हिंग' हा मूकपट त्यांचा पहिला चित्रपट होता. तर 1921 मध्ये आलेली 'द किड' ही त्यांची पहिली फीचर फिल्म ठरली. चार्ली चॅपलिन यांनी आपल्या आयुष्यात दोन महायुद्ध पाहिली. ज्यावेळी जग युद्धाची झळ सोसत होत, त्यावेळी चार्ली चॅपलिन लोकांना हसवत होते. चार्ली चॅपलिन एकदा म्हणाले होते की, "माझं दु:ख एखाद्याच्या हसण्याचं कारण असू शकतं. पण माझं हास्य कोणाच्याही दु:खाचं कारण ठरु नये."

अनेक चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात
चार्ली यांनी 'अ वुमन ऑफ पॅरिस', 'द गोल्ड रश', 'द सर्कस', 'सिटी लाईट्स', 'मॉर्डन टाइम्स' यांसारख्या प्रसिद्ध आणि यशस्वी चित्रपटांमध्ये काम केलं. हे चित्रपट आजही पसंत केले जातात.खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यही वादात
खासगी आयुष्यासोबतच चार्ली यांचं प्रोफेशनल आयुष्यही चर्चेत आणि वादग्रस्त होतं. 1940 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'द ग्रेट डिक्टेटर' चित्रपटाने फारच वाद झाला होता. या सिनेमात चार्ली चॅपलिन यांनी जर्मनीचा चॅन्सलर हुकुमशाह अॅडॉल्फ हिटलरची व्यक्तिरेखा साकारली होती. यानंतर अमेरिकेत त्यांच्यावर कम्युनिस्ट असल्याचा आरोपही झाला. इतकंच नाही तर एफबीआयकडून त्यांची चौकशीही झाली. यानंतर चार्ली यांनी अमेरिकेला कायमचा रामराम केला आणि स्वित्झर्लंडमध्ये स्थायिक झाले.

कौटुंबिक आयुष्यातील उलथापालथ
चार्ली चॅपलिन यांनी त्यांच्या कौटुंबिक आयुष्यात फारच उलथापालथ पाहिली. त्यांनी एकूण चार लग्न केली होती. या लग्नातून त्यांना 11 अपत्य झाली. त्यांनी पहिलं लग्न 1918 मध्ये मिल्ड्रेड हॅरिससोबत केलं होतं. पण हे लग्न दोन वर्षच टिकलं. यानंतर त्यांनी लिटा ग्रे, पॉलेट गॉडर्ड आणि 1943 मध्ये 18 वर्षांच्या उना ओनिलसोबत लग्न केलं. त्यावेळी चार्ली 54 वर्षांचे होते. चार्ली चॅपलिन यांची चारही लग्न फारच वादात राहिली होती.महात्मा गांधींचे चाहते
प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन आणि ब्रिटनची महाराणी यांसारखे दिग्गज चार्ली चॅपलिन यांचे चाहते होते. तर स्वत: चार्ली चॅपलिन भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील महात्मा गांधी यांच्या कार्यावर अतिशय प्रभावित होते. ते महात्मा गांधी यांचा नितांत आदर करत होते. भारताचे प्रसिद्ध बॉलिवूड कलाकारही चार्ली यांचे चाहते होते. राज कपूर यांनी आपल्या अनेक सिनेमात चार्ली चॅपलिन यांची कॉपी केली होती.

मृतदेहाची चोरी
25 डिसेंबर 1977 रोजी वयाच्या 88 व्या वर्षी चार्ली चॅपलिन यांचं निधन झालं. परंतु मृत्यूच्या दोन महिन्यानंतर काही लोकांनी त्यांचा मृतदेह चोरला होता. त्याचं कॉफिनचं चोरल्याचं चौकशीतून समोर आलं होतं. चार्ली यांच्या कुटुंबियांकडून खंडणी मागण्याच्या उद्देशाने मृतदेहाची चोरी करण्यात आली होती. चोरांनी 6 लाख स्विस फ्रँक्सची मागणी केली होती. परंतु त्यांच्या पत्नीने ही रक्कम देण्यास इन्कार केला होता. मात्र नंतर त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. यानंतर चोरीपासून वाचवण्यासाठी त्यांचा मृतदेह 6 फूट कॉंक्रिटच्या खाली दफन करण्यात आला.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Charlie Chaplin birth anniversary special : Unknown facts about actor Charlie Chaplin
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV