प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ प्रा. स्टीफन हॉकिंग यांचं निधन

भौतिकशास्त्र आणि कॉस्मोलॉजी (विश्वनिर्मिती) या क्षेत्रात भौतिकशास्त्रज्ञ प्रा. स्टीफन हॉकिंग यांचं भरीव योगदान आहे.

प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ प्रा. स्टीफन हॉकिंग यांचं निधन

केंब्रिज (इंग्लंड) : जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ प्रा. स्टीफन हॉकिंग यांचं केंब्रिजमधील राहत्या घरी निधन झालं. वयाच्या 76 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बिग बँग थिअरी, कृष्णविवरावरील हॉकिंग यांचं संशोधन भौतिकशास्त्रासाठी मोठं योगदान आहे.

केंब्रिजमधील निवासस्थानी बुधवारी सकाळी हॉकिंग यांची प्राणज्योत मालवली. हॉकिंग यांच्या मृत्यूबाबत कुटुंबीयांकडून माहिती देण्यात आली. त्यांच्या पश्चात ल्युसी, रॉबर्ट आणि टीम ही तीन मुलं आहेत. 'आमचे वडील महान शास्त्रज्ञ होते, त्यांचं कार्य पुढील अनेक वर्ष स्मरणात राहील' अशा भावना हॉकिंग यांच्या मुलांनी व्यक्त केल्या.

भौतिकशास्त्र आणि कॉस्मोलॉजी (विश्वनिर्मिती) या क्षेत्रात हॉकिंग यांचं भरीव योगदान आहे. बिग बँग थिअरी, सापेक्षतावाद आणि कृष्णविवरावरील त्यांचं कार्य जगप्रसिद्ध आहे. विपुल वैज्ञानिक पुस्तकांचं लेखन हॉकिंग यांनी केलं होतं. आईन्स्टाईननंतरचे मोठे शास्त्रज्ञ अशी त्यांची ख्याती आहे.
येत्या 100 वर्षात माणसाला पृथ्वी सोडावी लागेल, हॉकिंग यांचं भाकित

'ज्या माणसांवर तुम्ही मनापासून प्रेम करता, तेच जर जगात नसतील, तर हे जग काय कामाचं.' हे हॉकिंग यांचं वाक्य प्रसिद्ध आहे.

हॉकिंग यांचा जन्म 8 जानेवारी 1942 मध्ये इंग्लंडमधील ऑक्सफर्डशायरमध्ये झाला. ऑक्सफर्ड आणि केंब्रिज विद्यापीठात त्यांनी शिक्षण घेतलं.

स्टीफन हॉकिंग यांना 1963 मध्ये वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी मोटर न्यूरॉन या आजाराने ग्रासलं होतं. अवघ्या दोन वर्षांचं आयुष्य उरल्याचं त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना सांगितलं. मात्र व्हिलचेअरवर खिळलेल्या अवस्थेतही तब्बल 55 वर्ष हॉकिंग यांनी संशोधन केलं. अमेरिकेतील सर्वोच्च नागरी सन्मान त्यांना बहाल करण्यात आला होता.

येत्या 100 वर्षात मानवाला पृथ्वी सोडून नव्या ग्रहावर आसरा घ्यावा लागेल, असं भाकित स्टीफन हॉकिंग यांनी गेल्याच वर्षी केलं होतं. येत्या काही वर्षात पृथ्वी मानवी वास्तव्यायोग्य राहणार नसल्यानं माणसाला हे पाऊल उचलावंच लागेल, असा दावा त्यांनी केला होता.

विश्व शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Professor Stephen Hawking is dead at 76 latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV